अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; नियमबाह्य व संशयास्पद सोयाबीन तेलाचा मोठा साठा जप्त
गोंदिया, दि.3 : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यात भेसळयुक्त, निकृष्ट आणि मानकांचे अल्लंघन करणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन, गोदिया येथील अन्न सुरक्षा पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे दि.1 जून 2026 रोजी धडक कारवाई केली.
गोदिया शहरातील नगर परिषद परिसरात कार्यरत असलेल्या ‘मेसर्स गुरुनानक चिरोंजी भंडार’ या व्यावसायिक प्रतिष्ठानची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक आणि सखोल तपासणी केली. सदर तपासणीची कारवाई ही आस्थापनेचे मालक किशोर कन्हैयालाल नागदेव (वय 42 वर्षे) याच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पाडण्यात आली.
तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे गंभीर व नियमबाह्य बाबी आढळून आल्या. निकृष्ट दर्जाचा संशय : बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेले ‘कुबेर’ ब्रेडचे रिफाइंड सोयाबीन तेल हे अन्न सुरक्षा मानकांनुसार अत्यंत निकृष्ट व अप्रमाणित असल्याचा तीव्र संशय पथकाला आला. *जुन्या डब्याचा धोकादायक पुनर्वापर :* सदर तेल रिपॅकिंग करण्यासाठी आधीच वापरण्यात आलेल्या जुन्या आणि दूषित टीनच्या डब्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचा संशय पथकाला आला. अशा जुन्या डब्याच्या पुनर्वापरामुळे खाद्यतेलामध्ये रासायनिक क्रिया इतर विषारी घटकांचे मिश्रण होण्याची भीती असते, जी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत, अन्न सुरक्षा पथकाने ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन 688.4 किलो ग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जागीच जप्त केला. या जप्त केलेल्या मालाची एकूण बाजारातील किंमत 1 लाख 37 हजार 680 रुपये इतकी आहे.
जप्त करण्यात आलेल्या सोयाबीन तेलाचे अधिकृत अन्न नमुने कायद्यानुसार गोळा करण्यात आले असून ते पुढील रासायनिक विश्लेषणासाठी व प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानतर, संबंधित दोषी व्यक्ती आणि फर्मविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 मधील तरतुदीनुसार आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.
सदर धडक आणि यशस्वी कामगिरी सहायक आयुक्त अमृता शिर्के तसेच सह आयुक्त नागपुर कृष्णा जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंदिया कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी ओ.दे.लांजेवार यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.
नागरिकांना आवाहन : बाजारात विक्री होत असलेल्या कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत अथवा शुद्धतेबाबत शंका असल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनी तक्रार करतेवेळी स्वत:चे नाव व पत्ता, संपर्क क्रमांक तक्रारीत नमुद भेसळ होणाऱ्या ठिकाणाचा अथवा आस्थापनेचा अचुक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केजी जाते याची विशिष्ट माहिती तक्रारीत नमुद करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना केले आहे.
