सौंदड येथे रेल्वे फ्लायओव्हरच्या कामाच्या दिरंगाईमुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त
सडक अर्जुनी/सौंदड : सौंदड येथील रेल्वे फ्लायओव्हरच्या कामाला मोठा विलंब होत असल्याने परिसरात दररोज वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. आज दिनांक 19 जुलै रोजी वाहनांच्या रांगा ह्या बामणी/सावंगी गावा पर्यंत लागल्या होत्या. फ्लायओव्हरचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे मुख्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिक, व्यापारी व प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. 
विशेषतः सकाळी आणि सायंकाळी, रात्री ला गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. रेल्वे फाटक बंद असताना वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे. वाहनधारकांना अनेकदा तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 
स्थानिक नागरिकांच्या मते, फ्लायओव्हरचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असती. मात्र कामातील दिरंगाईमुळे परिसरातील व्यापारी व्यवहारांवरही परिणाम होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने कामाचा वेग वाढवून फ्लायओव्हर लवकरात लवकर पूर्ण करावा आणि वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
