सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल’ बँक खात्यांवर गोंदिया पोलिसांची कारवाई; २५ खातेदारांविरुद्ध गुन्हे दाखल
गोंदिया, प्रतिनिधी : देशभरात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल’ बँक खात्यांवर विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशा २५ बँक खातेदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून (I4C) एनसीआरपी पोर्टल व समन्वय पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार सायबर गुन्हेगार स्वतःची बँक खाती न वापरता फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी किंवा ती इतर खात्यांमध्ये वळवण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करतात. अशा खात्यांना ‘म्युल खाते’ म्हणून ओळखले जाते. 
सायबर गुन्हेगार अनेकदा निधी, कर्ज, जीएसटी, सिबिल स्कोअर वाढविणे किंवा नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगून नागरिकांना आमिष दाखवतात. काही प्रकरणांत कमिशन किंवा मोबदल्याचे आश्वासन देऊन बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड, चेकबुक, युजर आयडी व पासवर्डची माहिती मिळवली जाते. त्यानंतर ही खाती सायबर फसवणुकीतील व्यवहारांसाठी वापरली जातात.
पोलिसांनी स्पष्ट केले की, म्युल खाते विकणे किंवा दुसऱ्याला वापरण्यास देणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित खातेदारांवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि आपली बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये.
गोंदिया पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींना बँक खाते, सिमकार्ड, एटीएम, पासवर्ड किंवा चेकबुक वापरण्यास देऊ नये. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकाव साधावा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल गोंदिया व सर्व पोलीस ठाण्यांच्या वतीने सायबर फसवणुकीविरोधात ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.
