घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्न प्रकरणी १० आरोपींना अटक
१५ लाख रुपये किंमतीच्या तीन चारचाकी गाड्या जप्त.
देवरी,/ गोंदिया : आपल्या तत्परतेने घरफोडी (चोरी) करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरी पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या १५ लाख रुपये किमतीच्या तीन चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गोंदिया कॅम्प देवरी) अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी धाडी टाकून एकूण १० आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ६१ या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी कडून घटनेत समाविष्ट सुमारे १५ लाख किमतीच्या तीन चार चाकी वाहन जप्त केल्या आहेत. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यामध्ये देवरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम, किरण मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप हातझाडे, रामराव कांदे, चंदन बाटवे, चालक पो.ना.पंकज पारधी, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कुळमती, कमलकिशोर चौहान, घनश्याम मेंढे, विनोद बिसेन, गोपाल प्रसाद पांडे, पो. ह.राधेश्याम गाते, नरेंद्र फुलबांदे, रवी दहीपळे, पो.ना. संतोष सामरीत आणि पो. शि.संदीप तांदळे यांनी हे मोठे यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणाचा पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील स्वतः करत आहेत.
