महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत राजकुमार बडोले यांची नियुक्ती
नागपूर, दि. ०४ जून : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूरच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकारी परिषदेत त्यांचा समावेश झाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, शिक्षण व संशोधन क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत नियुक्ती झाल्याबद्दल आमदार राजकुमार बडोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी प्रतिक्रिया देताना बडोले म्हणाले की, राज्य शासनाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतृत्वाचा ऋणी आहे. कार्यकारी परिषदेचा सदस्य म्हणून विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच शेतकरी, पशुपालक, दुग्धव्यवसायिक व मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील.
राजकुमार बडोले यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या विकासाला चालना मिळण्यासह ग्रामीण भागातील पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
