Tuesday, June 9, 2026
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

मुंबई,दि.०७-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी केली आहे. राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

  राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एक निष्ठावान नेते असून, पक्षाचे विदर्भातील महत्त्वाचे संघटक मानले जातात. प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय असून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी, ते २००४ ते २०१६ पर्यतं विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. तर, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये ते महत्त्वाचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या नावाची पक्षाच्या कोअर कमिटीत प्रबळ दावेदार म्हणून चर्चा झाली होती.
error: Content is protected !!