Wednesday, June 10, 2026
गोंदियासड़क अर्जुनी

साहेब, ह्या अंगणवाड्यांचा वाली कोण? सडक अर्जुनी नगरपंचायत अंगणवाडी केंद्र क्र. २ मध्ये सुखसुविधांचा अभाव; गरोदर माता व बालकांच्या आरोग्याशी खेळ?

गोंदिया / सडक अर्जुनी ( सुशिल लाडे) – देशभरात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) च्या १० वर्षपूर्ती निमित्त “सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत” हा संदेश देत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मात्र दुसरीकडे सडक अर्जुनी नगरपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ ची दयनीय अवस्था शासनाच्या दाव्यांना हरताळ फासणारी ठरत आहे.

दिनांक ९ जून २०२६ रोजी या केंद्रात PMSMA अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. गरोदर महिला, माता व बालकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम झाला, मात्र ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या केंद्रातच मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे.

गरोदर महिलांना बसण्यासाठी जागा नाही, शौचालयाला चार वर्षांपासून कुलूप, गरोदर महिला जाणार कुठे!??

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार व अंगणवाडी सेविकेच्या माहितीनुसार , रंजना रोकडे सिस्टर, जगतात ताई यांनी सांगितले प्रमाणे , केंद्रात गरोदर महिलांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नाही. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. शौचालयाला गेल्या चार वर्षांपासून कुलूप असल्याने महिला व बालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

अंगणवाडीच्या परिसरातच घाण साचलेली असून दूषित वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महिलांसह लहान बालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार पत्रव्यवहार, तरीही प्रशासन झोपेत?

अंगणवाडी केंद्र क्रमांक २ च्या सेविकेने सांगितले की, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीकडे वारंवार लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनी देखील केंद्राला भेट दिल्यानंतर येथील असुविधांची दखल घेत संबंधित विभागाला पत्रव्यवहार केल्याचे सांगितले जाते. तरीही परिस्थिती जैसे थे असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जबाबदारी कोणाची? विभागांमध्ये ढकलाढकली

या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याऐवजी विभागांमध्ये परस्पर ढकलाढकली सुरू असल्याचे दिसून येत आहे.

• नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणतात की, अंगणवाडीच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असून केंद्र अद्याप नगरपंचायतीकडे हस्तांतरित झालेले नाही.

• तर दुसरीकडे गोंदियाचे उप बाल विकास प्रकल्प अधिकारी (Dy. CDPO) किर्तिकुमार कटरे यांच्या मते हे केंद्र नगरपंचायतीच्या अधिपत्याखाली येते.

दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असताना सर्वसामान्य महिला, गरोदर माता आणि बालकांना मात्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

“सुरक्षित मातृत्व”चा नारा आणि वास्तवात सुविधांचा बोजवारा

एकीकडे शासन “सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत” अशी घोषणा करत आहे, तर दुसरीकडे ज्या केंद्रात गरोदर महिलांसाठी कार्यक्रम आयोजित होतो, तेथेच शौचालय, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

आता प्रश्न एकच…

सडक अर्जुनी नगरपंचायत अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मधील गरोदर माता व बालकांच्या हालअपेष्टांना जबाबदार कोण? या अंगणवाडीचा वाली नेमका कोण? प्रशासन जागे होणार की महिलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार?

स्थानिक नागरिकांनी या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी, महिला व बालविकास विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

error: Content is protected !!