Sunday, June 21, 2026
क्राइमगोंदियासालेकसा

पोलिसांची धडक कारवाई; 7 लाख 40 हजार चा अवैध देशी दारूचा साठा जप्त

सालेकसा, दि. 21 जून : गोंदिया जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठा व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सालेकसा पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 21 जून रोजी सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरोला ते तिरखेडी मार्गावर संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी महिंद्रा बोलेरो (क्र. MH-28-V-4420) हे वाहन अडवून पंचासमक्ष झडती घेण्यात आली.

तपासणीत वाहनामध्ये रॉकेट देशी दारूच्या 60 पेट्या आढळून आल्या. प्रत्येक पेटीत 100 नग, 90 एम.एल. क्षमतेचे पाऊच असल्याने एकूण 6 हजार देशी दारूचे पाऊच जप्त करण्यात आले. या दारूची किंमत 2 लाख 40 हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो वाहनाची किंमत 5 लाख रुपये असल्याने एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणात संजय सदाशिव राऊत (वय 50) व गणेश ईश्वर निकोडे (वय 36) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी कोणताही वैध परवाना अथवा पास नसताना अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात अप. क्र. 311/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ), 65 (ई), 77 (अ), 77 (ब) व 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक बुराडे यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा. खुशरंग बिसेन, खांडवाहे, लांडगे, पो.ना. जांभुळकर, पो.शि. नागदिवे व गौतम यांनी ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरीत्या पार पाडले.

error: Content is protected !!