MS-CIT ला प्रतिष्ठित SKOCH पुरस्कार; गोंदियात ‘चला, महाराष्ट्राला AI सज्ज बनवूया’ अभियानाचा शुभारंभ
गोंदिया/ सडक अर्जुनी : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) च्या सिल्व्हर ज्युबिली वर्षानिमित्त राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल साक्षरता अभ्यासक्रम MS-CIT ला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award 2026 ने गौरविण्यात आले आहे. डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि सामाजिक परिवर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जात आहे.

अभियानांतर्गत नागरिकांसाठी 60 मिनिटांची मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध करण्यात आली असून इच्छुकांनी www.mscit.ai या संकेतस्थळावर नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
MS-CIT च्या नव्या AI-सक्षम अभ्यासक्रमात 125 हून अधिक AI कौशल्ये आणि 250 पेक्षा अधिक डिजिटल कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ChatGPT, Microsoft Copilot, Google Gemini, Canva AI यांसारख्या आधुनिक साधनांची माहिती दिली जाते. याशिवाय डेटा सायन्स, वेब डिझायनिंग, पायथन, सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, GST आदी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
याबाबत माहिती देताना MKCL चे गोंदिया जिल्हा समन्वयक उमेश वेद्य यांनी सांगितले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील कौशल्य नसून आजच्या काळातील अत्यावश्यक कौशल्य आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकाने या AI मास्टरक्लासमध्ये सहभागी होऊन स्वतःला AI युगासाठी तयार करावे. MS-CIT ला मिळालेला SKOCH पुरस्कार हा महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून जिल्ह्यातील सर्व MKCL अधिकृत शिक्षण केंद्रे ही संधी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत आहेत.”
दरम्यान, आगामी काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी AI जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून शाळा, महाविद्यालये, उद्योग संस्था, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन MKCL तर्फे करण्यात आले आहे.
