Thursday, July 16, 2026
सड़क अर्जुनीक्राइम

रेंगेपार नाल्यातून रेती उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई, ट्रॅक्टर जप्त

सडक अर्जुनी, दि. १५ जुलै : तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून, मौजा डोंगरगाव येथील रेंगेपार नाल्यातून बिनापरवाना रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने धडक कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवारी (दि. १५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रेंगेपार नाल्यातून रेती भरून डोंगरगावकडे जात असलेल्या MH-35 AW-7506 क्रमांकाच्या ट्रॅक्टरला महसूल विभागाच्या पथकाने अडविले. संबंधित ट्रॅक्टरमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली.

तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी लिलाधर कापगते (रेंगेपार/द.) व ग्राम महसूल अधिकारी हनुमंत आंबेकर (घाटबोरी/तेली) यांनी सहभाग घेतला. पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तो पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथे जमा केला.

जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर हा नरेश महादेव शेंडे (रा. डोंगरगाव) यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गौण खनिज नियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले.

दरम्यान, तालुक्यातील नाले व नदीपात्रांमधून रात्रीच्या अंधारात तसेच दिवसाढवळ्या अवैध रेती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी करणाऱ्या अशा प्रकारांवर प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. .

error: Content is protected !!