जनसेवेतून स्व. अजितदादा पवारांना अभिवादन; अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रात २२ ते २७ जुलै दरम्यान ‘जनसेवा सप्ताह
सडक अर्जुनी : विकासाभिमुख राजकारण आणि लोकसेवेची परंपरा जपणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघात २२ ते २७ जुलैदरम्यान भव्य ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. आमदार इंजि. राजकुमार बडोले यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या सप्ताहात रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, फळवाटप तसेच कृषी व महिला सशक्तीकरण पुरस्कार वितरण यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 
सडक अर्जुनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बडोले यांनी या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजाच्या विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 
जनसेवा सप्ताहाची सुरुवात २२ जुलै रोजी कोलारगाव-कोसबी येथे वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रमाने होणार असून, त्याच दिवशी तेजस्विनी लॉन, शेंडा रोड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २३ जुलै रोजी अर्जुनी-मोर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून जयंती साजरी करण्यात येणार आहे.
२४ जुलै रोजी युवा संकल्प अभियानांतर्गत तहसील कार्यालय व उपजिल्हा रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. २५ जुलै हा दिवस विशेष ठरणार असून महागाव येथे आरोग्य शिबिरासोबतच आशिर्वाद लॉन, सडक अर्जुनी येथे समाधान शिबिर, स्व. अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार आणि स्व. अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. २६ जुलै रोजी पांढरी येथे आरोग्य शिबिर तर २७ जुलै रोजी दुर्गा चौक परिसरात स्वच्छता अभियान राबवून सप्ताहाची सांगता होणार आहे.
“स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांना खरी श्रद्धांजली म्हणजे समाजाच्या सेवेसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे,” असे प्रतिपादन आमदार राजकुमार बडोले यांनी यावेळी केले. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिक, युवक, महिला, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, महिला तालुकाध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे तसेच युवक शहराध्यक्ष आकाश गुप्ता उपस्थित होते.
