ग्रामीण खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज — जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर
अर्जुनी/मोर : ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्तेला चालना देण्याच्या उद्देशाने अरुणनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य फुटबॉल स्पर्धेला शनिवारी दिमाखात सुरुवात झाली. युवा सांस्कृतिक तथा क्रीडा असोसिएशनच्या पुढाकाराने होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी ग्रामीण खेळाडूंना संधी, योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. 
फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला खेळाडूंसह क्रीडाप्रेमी, आयोजक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. स्पर्धेच्या निमित्ताने अरुणनगर परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध राज्यांमधून आलेल्या संघांचा सहभाग. खुल्या गटात ३२, तर ग्रामीण गटात २८ संघ, अशा एकूण ६० संघांनी स्पर्धेत नोंदणी केली आहे. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मणिपूर आणि पश्चिम बंगालमधील संघांसह महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आदी शहरांतील संघ मैदानात उतरले आहेत. काही संघांमध्ये विदेशी खेळाडूंचाही सहभाग असल्याने स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना लायकराम भेंडारकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात चमक दाखविण्याची क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. मात्र, त्यांना योग्य संधी आणि दर्जेदार स्पर्धांचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. स्थानिक खेळाडूंना अशा स्पर्धांमधून अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळतो. हा अनुभव त्यांच्या भविष्यातील क्रीडा प्रवासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेतील बक्षिसांची रक्कमही आकर्षक ठेवण्यात आली आहे. खुल्या विभागातील विजेत्या संघाला ७७ हजार ७७७ रुपये, उपविजेत्या संघाला ३३ हजार ३३३ रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला २२ हजार २२२ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. ग्रामीण विभागात प्रथम क्रमांकासाठी ३० हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार १ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार १ रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
८ ऑगस्टपासून सुरू झालेली ही फुटबॉल स्पर्धा १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अरुणनगर परिसरात फुटबॉल सामन्यांची चुरस आणि क्रीडाप्रेमींची गर्दी पाहायला मिळणार आहे.
कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमा ढेंगे, जि.प. सदस्य जयश्री देशमुख, पं.स. सदस्य नाजुक कुंभरे, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नायब तहसीलदार पेंदामजी, सरपंच मिनती किर्तुनिया, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, तंटामुक्ती अध्यक्ष प्राणगोपाल दास, माजी सरपंच बाबुल बनिक यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, खेळाडू, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
