Friday, September 25, 2026
क्राइमगोंदिया

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३ जणांवर गुन्हे

गोंदिया : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली. डुग्गीपार व गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये २ ब्रास वाळूसह दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून एकूण १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणांत तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सालईटोला–देविटोला मार्गावर पहिली कारवाई

दि. २१ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालईटोला ते देविटोला मार्गावर ट्रॅक्टरद्वारे अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली. त्यावेळी देविटोला येथून एक ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी तो थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता संबंधिताकडे कोणताही परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत ७ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी उमाकांत मनोहर लंजे (वय ३२, रा. कोहळीटोला आदर्श, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारंजा–डव्वा मार्गावर दुसरी कारवाई

त्याच दिवशी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारंजा ते डव्वा मार्गावर ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी कारंजा–डव्वा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी केली. काही वेळाने कारंजा येथून एक ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. संबंधित चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईत ८ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ट्रॅक्टर चालक जगदीश कोहळे (वय ३८, रा. कवलेवाडा, ता. व जि. गोंदिया) आणि ट्रॅक्टर मालक दिनेश तांडेकर (वय ३५, रा. कवलेवाडा, ता. व जि. गोंदिया) यांच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दोन कारवायांत १५.१२ लाखांचा मुद्देमाल

स्थानिक गुन्हे शाखेच्या या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण २ ब्रास वाळू आणि दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १५ लाख १२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सोमेन्द्रसिंग तूरकर, पोहवा दीक्षितकुमार दमाहे, पोहवा भोजराज बहेकार, पोहवा तुलसीदास लुटे, पोहवा दुर्गेश तिवारी, पोशि सुनील डहाके, पोशि निखिल मेश्राम, पोशि राकेश इंदूरकर आणि चापोशी विलेश ठाकरे यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!