रानभाज्यांच्या माध्यमातून पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व रोजगार निर्मितीला चालना — आमदार राजकुमार बडोले
सडक अर्जुनी : तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय परिसर, सडक अर्जुनी येथे तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवास आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थित राहून रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. 
गोंदिया जिल्हा मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राने व्यापलेला असून या परिसरात विविध प्रकारच्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या या रानभाज्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आमदार बडोले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, “रानभाज्या या आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे या पारंपरिक खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष होत असले, तरी रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक, जीवनसत्त्वे व खनिजे उपलब्ध असतात. त्यामुळे निरोगी व सकस आहाराच्या दृष्टीने रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याची गरज आहे.” 
रानभाज्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास महिला बचत गट, शेतकरी आणि वन परिसरातील नागरिकांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होऊ शकते. रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मिती, महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच शेती व पर्यटनाला चालना देण्याची मोठी क्षमता आहे, असेही आमदार बडोले यांनी सांगितले.
रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रानभाज्यांची ओळख, त्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी महत्त्व आणि पारंपरिक खाद्यपद्धती याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून रानभाज्यांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती चेतनजी वडगाये, तहसीलदार इंद्रायणी गोमासे, पंचायत समिती उपसभापती निशाताई काशिवार, सदस्य शालिंदरजी कापगते, वर्षाताई शहारे, शिवाजीजी गहाणे, अल्लूद्दीनजी राजानी, दीपालीताई मेश्राम, तालुका कृषी अधिकारी रवींद्रजी लांजेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रल्हादजी कोरे, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष हरिदासजी कापगते, तालुका व्यवस्थापक उमेद अतुलजी मुरकुटे, तालुका व्यवस्थापक पालिद्राताई अंबादे यांच्यासह महिला बचत गटांच्या महिला, शेतकरी बांधव व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. महिला बचत गटांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पारंपरिक रानभाज्यांची माहिती व त्यांचे खाद्यपदार्थ नागरिकांसमोर सादर केले.
