सडक अर्जुनीमध्ये बालगोपालांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा
डॉ.सुशील लाडे..
सडक अर्जुनी : बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी चिमुकल्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी पूर्व विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. शालाबादा प्रमाणे यावर्षी सुद्धा सडक अर्जुनी नगरात बालगोपालांचा आवडता सण तान्हा पोळा उत्साह पूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. तान्हा पोळा आयोजक मंडळानी उत्तम रित्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयोजक मंडळात नगर अध्यक्ष तेजराम किसन मडावी, ललित अग्रवाल, नगरसेवक आनंद अग्रवाल, नगरसेवक महेंद्र वंजारी , निखिल मडावी, डेविड सयाम, संजय प्रधान, उमराव प्रधान, निकेश प्रधान,नितेश प्रधान , प्रेम जाधव, शुभम प्रधान आणि इतर सदस्य यांनी मोलाचा सहभाग घेतला. 
शहरात बालगोपालांचा लाडका सण असलेला तान्हा पोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. लहानग्यांनी सजविलेले आकर्षक लाकडी व मातीचे बैल घेऊन परिसरात मिरवणुका काढल्या.
या वेळी बालकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला. विविध रंगांनी सजविलेले बैल, आकर्षक सजावट आणि बालगोपालांचा उत्साह यामुळे शहरातील वातावरण आनंदमय झाले होते.
ठिकठिकाणी नागरिकांनी बालकांचे कौतुक करत त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला. ग्रामीण संस्कृती व परंपरेचे जतन करणारा हा सण नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी अशा पारंपरिक उत्सवांचे महत्त्व असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
तान्हा पोळ्याच्या मिरवणुकीतून सामाजिक जागृतीचा संदेश; बालगोपालांनी मांडले सामाजिक संदेश देणारे विचार..
पारंपरिक उत्सवाला सामाजिक जागृतीची जोड देत सडक अर्जुनीतील बालगोपालांनी यंदाचा तान्हा पोळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. आकर्षक सजविलेल्या लाकडी व मातीच्या बैलांसोबतच हातात सामाजिक संदेशांचे फलक घेऊन चिमुकल्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. 
मिरवणुकीत सहभागी झालेल्या बालकांनी केवळ परंपरेचे जतन केले नाही, तर समाजाला विचार करायला लावणारे संदेशही दिले.” नको हट्ट मुलाचा मुलगी सुद्धा वंश कुटुंबाचा,” “आयुष्यात खूप कष्ट झाले तरी आत्महत्या करण्याचा विचारसुद्धा मनात आणू नका” असा बळीराजाला जीवनमूल्यांचा संदेश देणारा फलक विशेष लक्षवेधी ठरला. संघर्षाच्या काळात खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याचा संदेश चिमुकल्यांनी आपल्या निरागस शैलीत दिला. 
याशिवाय विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे संदेश फलकांवर झळकले. त्यामुळे तान्हा पोळ्याचा पारंपरिक उत्सव मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरला.
रंगीबेरंगी सजावट केलेले बैल, पारंपरिक वेशभूषेतील बालगोपाल आणि सामाजिक संदेशांचे फलक यामुळे रस्त्यावर एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पालकांसह नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

