पेन्शन बिल मंजुरीसाठी चार हजारांची लाच; पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक ACBच्या जाळ्यात
गोंदिया : निवृत्त मुख्याध्यापिकेच्या सुधारित पेन्शन बिलाचे काम करून चेक देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गोंदिया पंचायत समितीच्या आस्थापना विभागातील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी सापळा रचून ताब्यात घेतले. संदीप शाहूराव सानप (वय ३१), कनिष्ठ सहाय्यक, आस्थापना विभाग, पंचायत समिती गोंदिया, असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. 
ACBकडील माहितीनुसार, तक्रारदार महिला या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, दवणेवाडा, ता. जि. गोंदिया येथून मुख्याध्यापिका पदावरून डिसेंबर २०२० मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यानंतर त्यांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत पेन्शन मिळत होती.
पेन्शनची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कपात झालेली रक्कम मिळण्यासाठी तसेच पेन्शनमध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी पंचायत समिती शिक्षण विभाग, गोंदिया येथे अर्ज केला होता. या कामाच्या अनुषंगाने तक्रारदारांनी कनिष्ठ सहाय्यक संदीप सानप यांची भेट घेतली.
ACBच्या तक्रारीनुसार, तक्रारदारांचे बिल पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावेळी तक्रारदारांकडील एक हजार रुपये घेण्यात आले असून, उर्वरित चार हजार रुपये चेक तयार झाल्यानंतर देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी १७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने ACBने पंच व व्हॉइस रेकॉर्डरसह पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान तक्रारदारांच्या सुधारित पेन्शन बिलाचे काम करून चेक देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे ACBने नमूद केले आहे.
यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदारांना पंच व व्हॉइस रेकॉर्डसह लाचेची रक्कम घेऊन पंचायत समिती गोंदिया येथील आस्थापना विभागात पाठविण्यात आले. यावेळी आरोपीने चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप असून, त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ACBने कळविले आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचेही अहवालात नमूद आहे. सध्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांनी केले. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांनी काम पाहिले. पथकात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, ASI करपे, HC बोहरे, HC कहालकर, NPC शेंडे, NPC बोपचे, NPC कापसे, NPC काटकर, NPC सोनवणे, LNPC पटले व LNPC डांगे यांचा समावेश होता.
या कारवाईस पोलीस अधीक्षक दिंगबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

नागरिकांना ACBचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. गोंदिया येथील ACB घटक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07182-251203 असून, संपर्कासाठी 9209041064 हा क्रमांकही देण्यात आला आहे.
