Tuesday, October 6, 2026
अर्जुनी मोर

शिक्षण-आरक्षण-धम्मासाठी आता राज्यव्यापी संघटन; सामाजिक प्रश्नांवर व्यापक लढ्यासाठी राजकुमार बडोले फाऊंडेशन सज्ज

सुशिल लाडे…

अर्जुनी-मोर: सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर सुरू असलेली चळवळ आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार राजकुमार बडोले फाऊंडेशनच्या बैठकीत करण्यात आला. शिक्षण, आरक्षण आणि धम्माचरण या तीन प्रमुख मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत संघटन मजबूत करण्याचे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार इंजी. राजकुमार बडोले यांनी केले.

नवेगावबांध येथील एमटीडीसी राष्ट्रीय उद्यानात दि. ४ रोजी फाऊंडेशनची महत्त्वपूर्ण बैठक आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रशांत शहारे, विश्वजीत डोंगरे, आर. के. जांभुळकर, व्यंकट खोब्रागडे, सुरेंद्रकुमार ठवरे, राकेश भास्कर, मिनाताई शहारे, सुशिल लाडे , हितेश डोंगरे , आणि फाऊंडेशन चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

गोंदियातून सुरू झालेली वाटचाल आता महाराष्ट्रभर

अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातून सुरू झालेल्या फाऊंडेशनच्या कार्याचा विस्तार गोंदिया जिल्ह्यात झाला असून, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करण्याची गरज आमदार बडोले यांनी व्यक्त केली. महाबोधी विहार मुक्ती आंदोलन, भीमा-कोरेगावचा प्रश्न आणि अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासारख्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर फाऊंडेशनने भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.

“सामाजिक न्यायाचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी संघटन मजबूत करणे आवश्यक आहे. संघर्षाशिवाय समाजाला काहीही मिळत नाही,” असे प्रतिपादन आमदार बडोले यांनी केले.

गावागावांत बौद्ध ग्रामसंघ उभारण्याचे आवाहन

फाऊंडेशनच्या संघटन विस्तारासाठी गावागावांत बौद्ध ग्रामसंघ, तसेच तालुका व जिल्हास्तरावर संघटनात्मक रचना उभारण्यावर बैठकीत भर देण्यात आला. सामाजिक प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करून समाजातील विविध घटकांना संघटित करण्याचे आवाहन करण्यात आले.

नव्या पिढीला धम्मशिक्षणाची गरज

लहान वयातच मुलांमध्ये धम्माचे संस्कार रुजविण्यासाठी धम्मशाळा, धम्मशिक्षण आणि धम्मप्रशिक्षण यावर विशेष भर देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार व्यापक करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. आगामी काळात शिक्षण, आरक्षण आणि धम्माचरण या तीन विषयांवर राज्यव्यापी जनजागृती आणि सामाजिक संघर्ष उभारण्याची दिशा बैठकीत निश्चित करण्यात आली.

सभेचे प्रास्ताविक प्रशांत शहारे यांनी केले. संचालन हितेश डोंगरे यांनी, तर आभार राकेश भास्कर यांनी मानले. बैठकीला फाऊंडेशनचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!