Friday, October 9, 2026
क्राइमगोंदियाभंडारासड़क अर्जुनी

शासकीय तांदूळ चोरी प्रकरणात सडक अर्जुनी बाजार समितीचे सचिव संजय भैय्यालाल पुस्तोडे पोलिसांच्या ताब्यात

सडक अर्जुनी (गोंदिया) : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील शासकीय तांदूळ चोरीच्या प्रकरणाने आता गोंदिया जिल्ह्यातही खळबळ उडवली आहे. शासकीय गोदामातून तब्बल ३६१ कट्टे तांदूळ चोरीला गेल्याप्रकरणी सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तथा राईस मिल संचालक संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे यांना साकोली पोलिसांनी अटक केली आहे.

साकोली येथील शासकीय गोदामाचे शटरचे नट-बोल्ट काढून चोरट्यांनी सुमारे ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा तांदूळ लंपास केला होता. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी गिरोला (हेटी) येथील रहिवासी संजय भैय्यालाल पुस्तोडे यांच्यापर्यंत तपासाची सूत्रे नेली. चोरी झालेल्या तांदळाची खरेदी, त्याची साठवणूक आणि पुढील विक्रीच्या व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी पिकअप वाहनासह चोरीच्या तांदळापैकी सुमारे ५० टक्के माल जप्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीचा माल कुठे-कुठे पाठविण्यात आला आणि या व्यवहारामागे नेमके कोणाचे जाळे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

धान खरेदी केंद्रांच्या व्यवहारांकडेही लक्ष

संजय पुस्तोडे यांच्या अटकेनंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील धान खरेदी केंद्रांच्या कारभाराचीही चर्चा सुरू झाली आहे. तालुका शेतकी खरेदी-विक्री समिती, देवरी अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील धान खरेदी केंद्र तसेच माँ वैष्णवी बहुउद्देशीय सहकारी संस्था, गिरोला या केंद्रांच्या कामकाजाशीही त्यांचा संबंध असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, बाजार समितीचे सचिव म्हणून नियमित वेतन घेत असतानाही ते कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता शासकीय तांदूळ चोरीच्या प्रकरणात अटक झाल्याने त्यांच्या कार्यकाळातील धान खरेदी केंद्रांच्या व्यवहारांचीही चौकशी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.


इतर दहा आरोपी

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये महेंद्र शिवचरण चौधरी, महेश विकास पुसाम, दीपक देवण वाघाडे, निकेश देवराम बावनकर आणि गोवर्धन चिंधुजी सयाम ( कोसमतोंडी) , नारायण नामदेव गाहणे ( वडेगाव), संजय भैय्यालाल पुस्तोडे ( गिरोला/ हेटी), राकेश दयाराम आगाशे ( साकोली), प्रदीप नंदकुमार बोधनकर( कोसमतोंडी) रितेश रविशंकर जैस्वाल ( नवेगावबांध) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर संजय भैय्यालाल पुस्तोडे आणि रितेश जैस्वाल हे राईस मिल संचालक असून ,चोरीच्या शासकीय धान्याच्या कथित खरेदी विक्रीतील त्यांची भूमिका तपासली जात आहे.


अटकेनंतर निलंबनाच्या कारवाईची शक्यता

संजय पुस्तोडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनासमोरही प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला २४ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत ठेवण्यात आल्यास लागू सेवा नियमांनुसार निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असते. चर्चा आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी चे सचिव म्हणून कार्यरत संजय भैय्यालाल पुस्तोडे हे बाजार समिती मध्ये कमी प्रमाणात उपस्थित राहत असतात. आणि आपले बाहेरील कामे ही करीत असतात मात्र वेतन पूर्ण घेत असतात अशा चर्चा आता परिसरात रंगत आहेत.

त्यामुळे गोंदिया जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ पुस्तोडे यांच्याविरुद्ध कोणती प्रशासकीय कारवाई करणार, याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील चोरीचा संपूर्ण माल, इतर संभाव्य आरोपी आणि शासकीय तांदळाच्या व्यवहाराची साखळी याबाबत साकोली पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.