Friday, October 9, 2026
अर्जुनी मोर

अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे कार्य समाजाच्या आरोग्याचा मजबूत आधार’ – लायकराम भेंडारकर

सेवा संकल्प अभियानांतर्गत चान्ना/बाक्टी येथे सत्कार

अर्जुनी-मोर. दि.8 ऑक्टोबर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सेवाभावी उपक्रमांनी युक्त ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, चान्ना/बाक्टी येथे जिल्हा परिषद बोंडगाव देवी क्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते दि. ७ रोजी सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले, “अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रामीण भागातील माता-बाल आरोग्य, पोषण, लसीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही त्या सातत्याने करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही जबाबदारीने सेवा बजावणाऱ्या या सेविकांच्या कार्याचा सन्मान होणे ही समाजाची जबाबदारी आहे.”

अंगणवाडी सेविका व मदतनीसांकडून माता-बाल आरोग्य, पोषण, लसीकरण, पूर्व प्राथमिक शिक्षण, कुपोषण निर्मूलन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते. ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांशी थेट संपर्क ठेवून त्या माता व बालकांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या आरोग्य व पोषणविषयक योजना पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बालकांच्या शिक्षणाची प्राथमिक पायाभरणी, मातांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि कुपोषणाविरोधातील जनजागृती यासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असून, अशा सेवाभावी कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी सन्मान व प्रोत्साहन होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे, पंचायत समिती सदस्य कुंदाताई लोगडे, पुष्पलताताई द्रुगकर, बाक्टीच्या सरपंच सरिताताई राजगीरे, पिंपळगावचे सरपंच विलास पुंडे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सेवाभावी कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेची भावना अधिक बळकट होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.