कोहमारा-नवेगावबांध मार्गावर भीषण अपघात; आई-मुलाचा मृत्यू, पती गंभीर जखमी
सुशिल लाडे….
सडक अर्जुनी, दि. 29 एप्रिल 2026 — सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते नवेगावबांध या राज्य महामार्ग क्रमांक 11 वर कनेरी नाल्याजवळ आज बुधवारला दुपारी भीषण अपघात घडला. समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने आई आणि लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे.


या भीषण धडकेत शुभांगी लांजेवार आणि रियांश लांजेवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर पितांबर लांजेवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वजण कोदामेडी (ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) येथील रहिवासी आहेत.
अपघाताची माहिती दुपारी 12:25 वाजता पोलिसांना मिळताच पोलीस ठाणे डुग्गीपार येथील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बस्तवाडे, पोलीस उपनिरीक्षक मट्टामी व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.
सदर घटनेबाबत अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
