Friday, September 11, 2026
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनीकरांनो सावधान! दही-लस्सी घेताय… भेसळ तर नाही ना?

सुशिल लाडे……

सडक अर्जुनी ३०/४/२६: उन्हाळ्याच्या कडक उष्णतेत थंडगार दही, लस्सी आणि ताक यांना मोठी मागणी असते. मात्र याच संधीचा फायदा घेत काही विक्रेते भेसळयुक्त पदार्थ विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
स्थानिक पातळीवर अनेक लस्सी व दही विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये स्वच्छतेचा अभाव, निकृष्ट दर्जाचे दूध, तसेच कृत्रिम रंग आणि साखरेचा अतिरेक वापर होत असल्याच्या तक्रारी अधूनमधून पुढे येत आहेत. काही ठिकाणी घट्टपणा आणण्यासाठी केमिकल्स किंवा पावडरचा वापर केला जात असल्याचीही चर्चा आहे, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

काही नागरिकांनी सांगितले की, काही लस्सी दुकानामध्ये लस्सी घेतल्यास वेगळाच वास येत असून त्या जास्त वेळ असल्यास लस्सीचा फेस निघत असून असतो ज्यामुळे पोटदुखी निर्माण झाली. उन्हाचा फायदा घेऊन फक्त पैसे कमविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्यासी खेळणे कितपत योग्य आहे. कित्येक लस्सी दुकानात कॉमिकल युक्त पावडर आणि धोकादायक रंग वापरत असतात. याकडे अन्न सुरक्षा विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

आरोग्य धोक्यात कसे?
भेसळयुक्त लस्सी किंवा दही सेवन केल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब, अन्न विषबाधा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
उघड्यावर विक्री होणारे पदार्थ टाळावेत
स्वच्छ व विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करावी
चव, वास किंवा रंग संशयास्पद वाटल्यास सेवन करू नये
शक्यतो घरी बनवलेले पदार्थ प्राधान्याने वापरावेत.

प्रशासनाकडे मागणी
सडक अर्जुनी तालुक्यात आणि परिसरातील थंड पेय, लस्सी व दही,फळे विक्रेत्यांची तात्काळ तपासणी करून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्न सुरक्षा विभागाने नियमित धाड टाकून नमुने तपासणे गरजेचे आहे.

” अन्न सुरक्षा विभागाने थंड पेय, भेसळ पावडर वापर लस्सी, कॉमिकल वापर करून फळे विकणे, दूध जन्य पदार्थात भेसळ करणे, आईस गोला विविध कलर करून देणे. अशा दुकानाची चौकशी करणे आणि कारवाया सुरू आहे. “

अमृता शिर्के
सहाय्यक आयुक्त (अन्न) गोंदिया

error: Content is protected !!