Friday, September 11, 2026
अर्जुनी मोर

जंगली जनावरांच्या हल्ल्यात जखमी व मृत झालेल्या कुटुंबीयांची आमदार बडोलेंनी घेतली सांत्वन भेट

अर्जुनी-मोर : अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मानव व जंगली हिंस्र प्राण्यांमधील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील नागरिक उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून असून, मोहफुलाच्या हंगामानंतर सध्या तेंदूपत्ता संकलनाचा रोजगार सुरू आहे. त्यामुळे जंगलात वाघ, बिबट व अस्वल यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर जंगली जनावरांच्या हल्ल्यात जखमी व मृत झालेल्या कुटुंबीयांची आमदार राजकुमार बडोले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच संबंधितांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

तालुक्यातील बोंडगाव-सुरबन परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या सुनीता दुकराम हटवार (वय ४७) यांच्यावर ९ मे रोजी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे उपचार सुरू आहेत. आमदार बडोले यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची विचारपूस केली तसेच उपचारासाठी आर्थिक मदतही केली.

दुसऱ्या घटनेत भरनोली येथील दीपक रतिकम गावडे (वय ४०) हे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेले असता अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून आमदार बडोले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.

याशिवाय बेजेगाव येथील कौशल्या राहटे या वृद्ध महिलेचा १० मे रोजी तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्यानंतर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आमदार बडोले यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

तसेच केशोरी येथील कुणाल नागेश्वर मेश्राम या युवकाचा सातारा जिल्ह्यात लाईनमन पदावर कार्यरत असताना १२ मे रोजी संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनाही आमदार बडोले यांनी भेट देऊन धीर दिला.

दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिक तेंदूपत्ता संकलन व शेतीच्या कामासाठी जंगल परिसरात जात असल्याने वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, पिंजरे लावून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार बडोले यांनी केली.

या भेटीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, जयंता लांजेवार, डॉ. राहुल खरे, भोजराज लोगडे, तानेश ताराम, योगेश नाकाडे, राजहंस ठोक, नितीन नाकाडे, नंदकुमार गहाणे, होमराज पुस्तोळे, विलास बोकर, संजय खरवडे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!