Tuesday, July 21, 2026
सड़क अर्जुनी

पांढरी ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी; प्रशासनाबाबत अविश्वास व्यक्त

सडक अर्जुनी : पंचायत समिती सडक अर्जुनी येत असलेल्या पांढरी ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकारी भास्कर वासुदेव झोडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत ग्रामपंचायत प्रशासक तथा सरपंच आणि प्रशासक समिती सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कामकाजाबाबत गावात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून ग्रामपंचायतीची अनेक कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच ग्रामपंचायती अंतर्गत होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात निधी खर्चाबाबत योग्य माहिती दिली जात नसल्याचा तसेच विकासकामांशी संबंधित कामगार, ठेकेदार आणि लाभार्थी यांना आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचेही म्हटले आहे.

प्रशासक समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत, पारदर्शक व जनहिताच्या दृष्टीने चालावे यासाठी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बदली करून नवीन अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायतीतील विविध कामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर प्रशासक तथा सरपंच रामलाल शोभेलाल नाईक यांच्यासह प्रशासक समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून, त्यात मनोहर बागडकर, सुमेद राऊत,प्रवीण अंबुले, कार्तिक राणे, भारती कटरे, मनिषा मेश्राम, शाल्लू शहारे, आणि लता भोयर इत्यादींनी सहमती दर्शवली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे

” ग्रामपंचायत पांढरी मध्ये मागील सहा महिन्या पुर्वी झालेल्या विकास कामांचे देयके देण्यास विनाकारण विलंब करीत आहेत.त्यामुळे आजही 15 वा वित्त आयोगाचे 40,00,000 लाखाच्या वर रूपये खर्च झाले नाहीत. त्यामुळे गावात विकास कामे थांबलेली आहेत. “

(रामलाल नाईक प्रशासक ग्रामपंचायत पांढरी)

“पावसाळ्यापूर्वी पूर्व तयारी म्हणून गावातील नाली उपसा, आणि इतर कामा विषयी चर्चा केली असता सदर ग्रामविकास अधिकार यावर बोलण्यास तयार नाही.ग्रामविकास अधिकारी यांची ग्रामपंचायत मधील प्रशासक मंडळाशी वागणूक बरोबर नाही.”

मनोहर बागडकर सदस्य प्रशासक मंडळ

(माजी उपसरपंच)

 

error: Content is protected !!