Friday, June 5, 2026
क्राइमदेवरी

घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्न प्रकरणी १० आरोपींना अटक

१५ लाख रुपये किंमतीच्या तीन चारचाकी गाड्या जप्त.

देवरी,/ गोंदिया : आपल्या तत्परतेने घरफोडी (चोरी) करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरी पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात एकूण १० आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या १५ लाख रुपये किमतीच्या तीन चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या २४ मे रोजी उषा नरेश शहारे (वय ४५, रा. वॉर्ड क्र. ०५, देवरी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार ह्या दि २३च्या मध्यरात्री आपल्या कुटुंबासोबत झोपलेल्या असताना, अज्ञात आरोपींनी कंपाऊंडची भिंत ओलांडून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि घर फोडण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीच्या आधारे, देवरी पोलीसांनी भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ६२, ३३१(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गोंदिया कॅम्प देवरी) अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी धाडी टाकून एकूण १० आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ६१ या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

अटक असलेल्या आरोपींमध्ये सौरभ हिरामण तलमले (वय २७ वर्षे, रा. पवनी, तहसील पवनी, जि. भंडारा), यादव रामचंद्र तलमले (वय २१ वर्षे, रा. पवनी, तहसील पवनी, जि. भंडारा), नितीन शेखर वालदेकर (वय २१ वर्षे, रा. शनिवार वार्ड, पवनी, तहसील पवनी, जि. भंडारा), विलास प्रल्हाद रामटेके (वय ५२ वर्षे, रा. खरमटोला, तहसील कुरखेडा, जि. गडचिरोली), शुभम ज्ञानेश्वर तेलमासरे (वय २३ वर्षे, रा. मुरलीधर काशीराम बडगे, पाचपावली, बारसेनगर, नागपूर), महादेव डोंगर लाहार (रा. नागपूर), दिनदयाल अनयोनी बेंजामिन (वय ४० वर्षे, रा. सोनबानगर, बोपुताईनगर वॉर्ड, नागपूर), राधेश्याम उर्फ राधे शिवदास खोब्रागडे (वय ३३ वर्षे, रहिवासी गंगाबाई घाट, सिद्धार्थ बौद्ध विहार जवळ, नागपूर),सौनव उर्फ गुल्लू सुदेश मासूरकर (वय ३० वर्षे, रहिवासी पचापावली, बारसेनगर, नागपूर), अजय उर्फ मामा राजेंद्र बागडे (वय ३५ वर्षे, रहिवासी बजरंगनगर, गल्ली क्र. १, भूखंड क्र. ५, मानेवाडा, नागपूर) यांचा समावेश आहे. यातील आरोपी क्र. १ ते ७ यांना ०१/०६/२०२६ रोजी, आरोपी क्र. ८ ला ०२/०६/२०२६ रोजी आणि आरोपी क्र. ९ व १० यांना ०३/०६/२०२६ रोजी अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपी कडून घटनेत समाविष्ट सुमारे १५ लाख किमतीच्या तीन चार चाकी वाहन जप्त केल्या आहेत. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यामध्ये देवरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम, किरण मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप हातझाडे, रामराव कांदे, चंदन बाटवे, चालक पो.ना.पंकज पारधी, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कुळमती, कमलकिशोर चौहान, घनश्याम मेंढे, विनोद बिसेन, गोपाल प्रसाद पांडे, पो. ह.राधेश्याम गाते, नरेंद्र फुलबांदे, रवी दहीपळे, पो.ना. संतोष सामरीत आणि पो. शि.संदीप तांदळे यांनी हे मोठे यश मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणाचा पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील स्वतः करत आहेत.

error: Content is protected !!