Friday, July 10, 2026
सड़क अर्जुनीगोंदिया

सडक अर्जुनीतील शतकोत्तर करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक; दुरुस्तीची मागणी

गोंदिया /सडक अर्जुनी – सुशिल लाडे  : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सडक अर्जुनी या शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सुमारे शंभर वर्षांचा इतिहास लाभलेल्या या शाळेला शताब्दी वर्षात पदार्पण झाले आहे. ( १०० वा वर्ष सुरू आहे)  ग्रामीण भागातील शिक्षणाचा दीपस्तंभ ठरलेल्या या शाळेतून आजवर अनेक अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, जनप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर घडले आहेत. अनेक पिढ्यांना शिक्षणाची दिशा देणाऱ्या या शाळेने समाजघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.       सांगायचे म्हणजे एकीकडे जिल्हा परिषद शाळांची संख्या कमी होत चालली आहे. तर उत्तम दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळावेत, विद्यार्थ्यांना उत्तम सोय सुविधा मिळाव्यात याकरिता शासन द्वारे विविध उपक्रम राबविले जातात.

मात्र, सध्या सडक अर्जुनी नगर पंचायत सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. तर काही इमारतीत पावसाळ्यात खिडक्यांमधून (छतामधून) मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणे कठीण होत आहे. वर्गखोल्यांमध्ये पाणी साचणे, भिंतींची पडझड होण्याची भीती तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ही शाळा तालुकास्तरीय केंद्रीय प्राथमिक शाळा म्हणून कार्यरत असून परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण येथे होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जीर्ण झालेल्या इमारती पासून संभाव्य अपघात रोखण्यासाठी शाळेची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्ष व शिक्षण आणि आरोग्य सभापती सुरेश हर्षे यांच्याकडे नगर पंचायत सडक अर्जुनी चे नगरसेवक अंकित भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुबीन शेख, सामाजिक कार्यकर्ते विनोद बारसागडे,फारुख शेख, आणि पालक वर्ग यांनी सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

स्थानिक नागरिक आणि पालकांनीही शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या ऐतिहासिक शाळेची इमारत सुरक्षित व सुसज्ज करण्यासाठी प्रशासनाने विशेष निधी उपलब्ध करून त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!