Wednesday, September 9, 2026
गोंदिया

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरीय शांतता समितीच्या बैठकीत सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेवर भर

डॉ. सुशिल लाडे –

गोंदिया – जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. यावेळी पोलिस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांचे ठाणेदार तसेच अशासकीय सदस्य व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध समाजघटकांनी सण-उत्सव परस्पर सहकार्याने व शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत डीजे आणि ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यावर विशेष भर देण्यात आला. सण-उत्सवांच्या काळात डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवावा, ध्वनीप्रदूषण होणार नाही याची आयोजकांनी दक्षता घ्यावी, तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी संबंधितांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

तसेच सणांच्या काळात मिरवणुका व कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, यासाठी आयोजकांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करावे. मिरवणुकीचे मार्ग, वेळ आणि वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही चर्चा झाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित होणार नाहीत, याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. कोणतीही माहिती खात्री न करता पुढे पाठवू नये आणि सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या प्रकारांना थारा देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.

पोलिस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून प्रत्येक सण-उत्सव शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

बैठकीत उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनीही विविध सूचना मांडत गोंदिया जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

error: Content is protected !!