घाटबोरी तेली – रेती तस्करीवर महसूल विभागाचा छापा; ट्रॅक्टर जप्त, JCB पसार!
सुशिल लाडे..
सडक अर्जुनी : तहसील कार्यालय सडक अर्जुनीच्या हद्दीतील घाटबोरी तेली परिसरात (बोथली रोडवर) कथितरीत्या अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडून तहसील कार्यालयात जमा केला. दरम्यान, रेती ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी वापरली जात असल्याचे सांगितले जाणारे JCB मशीन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बौद्धनगर/फुलेनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ काही रेतीचा साठा परवानगीशिवाय जमा करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी हनुमंत आंबेकर रात्री गस्त घालत असताना संबंधित ठिकाणी JCBच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये रेती भरली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी आंबेकर हे एकटे असल्याने घटनास्थळावरील ट्रॅक्टर व JCB चालकांनी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. JCBचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र रात्रीची वेळ व अंधारामुळे त्याचा क्रमांक स्पष्टपणे दिसला नसल्याने JCBची ओळख पटू शकली नसल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, ट्रॅक्टरचा पाठलाग करून तो पकडण्यात आला. संबंधित ट्रॅक्टर नालीत अडकल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो बाहेर काढून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅकर हा घाटबोरी तेली येथील देवानंद वंजारी यांचा आहे असे महसूल अधिकारी हनुमंत आंबेकर यांनीं सांगितले आहे.
या प्रकरणातील कथित अवैध रेती साठ्याचा पंचनामा करण्यात आला असून पुढील महसूल प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी यांनी दिली. नियमानुसार ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी घाटबोरी तेली येथील हळदीघाट परिसरातही काही रेती साठ्यावर महसूल विभागाने कारवाई केली होती. त्या प्रकरणातही पंचनामे करण्यात आल्याची माहिती आंबेकर यांनी दिली.
ही कारवाई तहसीलदार इंदायनी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी घाटबोरी तेली हनुमंत आंबेकर, ग्राम महसूल अधिकारी गोंगले राजेश्वर प्रधान आणि ग्राम महसूल अधिकारी सौंदड चेतन पुराम यांनी केली.
