Saturday, May 2, 2026
अर्जुनी मोरगोंदिया

बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची सभा

सुशिल लाडे…..

गोंदिया, दि.30 : बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीच्या सभेची पहिली बैठक 24 एप्रिल 2026 रोजी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, सरकारी कामगार अधिकारी संध्या पेंदोर, पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी शालिंदार कापगते व अजय शहारे, महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी सदस्या शितल गौर, बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी सदस्य जगदीश पंधरे व विवेक भेंडारकर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांतर्गत वाटप करण्यात आलेल्या लाभ वाटपाबाबत जसे- शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना व आर्थिक सहाय्य तसेच बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 1996 मधील तरतुदीनुसार दि.1 मे 2011 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले असून सदर मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामकाजात सुसुत्रता व पारदर्शकता यावी तसेच नोंदणी, नूतनणीकरण व लाभ वाटप प्रक्रिया लोकाभिमुख व्हावी तसेच बांधकाम कामगारांच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या नोंदणी/नुतनीकरण/लाभाच्या (DBT In Money) अर्जावर निर्णय घेण्याकरीता मंडळांतर्गत स्थानिक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरुन मंडळाचे दि.30 जानेवारी 2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे 63-अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदार संघाकरीता आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!