Saturday, May 2, 2026
गोंदियासड़क अर्जुनी

महाराष्ट्र दिनी मुरदोली पर्यटन गेटचे दिमाखात उद्घाटन; हजारो पर्यटकांची उत्स्फूर्त उपस्थिती

सुशिल लाडे…..

गोंदिया – सडक अर्जुनी | दि. 1 मे 2026- महाराष्ट्र दिनानिमित्त नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मुरदोली येथील नवीन सफारी गेटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातील हजारो पर्यटकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, क्षेत्र संचालक पियुषा जगताप, जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, विभागीय वनअधिकारी अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक विपिन लांडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने (सडक अर्जुनी बफर) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरपंच पुष्पाताई टेकाम, अविनाश काशिवार, गजानन परशुरामकर, प्रशांत बालसनवार, वनपाल दिगंबर बुरेले, वनपाल सी.एस. डोरले, पत्रकार, मिडिया प्रतिनिधी आणि वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरदोली सफारी गेटची खास वैशिष्ट्य म्हणजे हे प्रवेशद्वार वर्षभर (बारा महिने) पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

सफारी दरम्यान विविध वन्यप्राणी व समृद्ध जैवविविधता पर्यटकांना अनुभवता येत असून, विशेष म्हणजे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी वाघाचे दर्शन झाल्याने वाघप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. परिसरातील विविध वनस्पती आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांना एक वेगळाच आनंददायी अनुभव मिळत आहे.

मुरदोली पर्यटन गेटमुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असून, गोंदिया जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर या ठिकाणाची ओळख अधिक ठळक होणार आहे.

error: Content is protected !!