Saturday, May 9, 2026
क्राइमसड़क अर्जुनी

सोशल मीडियावर महापुरुषाची अपमानास्पद पोस्ट,भाजप पदाधिकाऱ्याला अटक

सडक अर्जुनी ,दि.०८: जिल्हाातील सडक अर्जुनी तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा गंभीर प्रक्रार समोर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.”दिनेश ब्राम्हणकर” या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार करून महापुरूषांविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक फोटो, व्हिडिओ आणि मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 6 मे रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कोसमतोंडी निवासी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलेला गौरेश बावनकर या युवकाला अटक केली आहे. बी.एन.एस. कायद्याच्या 299,302 कलमा द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला भंडारा कारागृहात जमा केले असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.

तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष सीता रहागंडाले यांनी सदर प्रकरणानंतर गौरेश बावनकरची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून संबंधित बनावट फेसबुक आयडी तयार करण्यात आली. त्या आयडीवरून महापुरूषांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्याने ओबीसी आणि एस.सी. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे आंबेडकरी तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापुरूषांनी देशात समता, बंधुता, मानवता आणि संविधानिक मूल्यांची शिकवण दिली आहे. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश देत त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. अशा महान व्यक्तिमत्त्वांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे तक्रारदारांनी डुग्गीपार पोलिसात या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दिनेश ब्राम्हणकर या खोट्या नावाने फेसबूक आयडी तयार करून सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी निवासी गौरेश बावनकर हा गेल्या तीन चार महिन्यापासून महापुरुषांचे अपमानास्पद व्हिडीयो तयार करून सोशल मिडियावर व्हायरल करीत असल्याचे सुज्ज्ञ नागरिकांच्या लक्षात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या बाबीची दखल घेत ६ मे रोजी डुग्गीपार पोलिसात तक्रार दाखल करीत महापुरुषांविषयी अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध घेवून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन रोशन बडोले, विदेश टेंभुरने, असलेस अंबादे, रूपचंद खोब्रागडे, हेमराज मेंढे, नरेश परशुरामकर,वामन हत्तीमारे, देवदास मेश्राम, सुधाकर कुर्वे, राजेश फुले, ओमप्रकाश टेंभुर्णी, कुणाल बडोले, कैलास बारसागडे, राहुल गणवीर, राजेश शहारे, शालिंदर कापगते, अनिल बावणे, भाग्यवान शहारे, अजय शहरे धम्मदीप शहरे, सावन शहारे, करण लांजेवार, पुण्यशील कोटांगले, विपेंद्र बडोले यांच्यासह तालुक्यातील इतर नागरिकांनी दिले होते.

सदर आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे माहिती डूग्गीपार पोलिसांनी दिली.

“अशा प्रकारचे बनावट आयडी तयार करून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करू नयेत.”
गणेश वनारे,ठाणेदार, डुग्गीपार पोलीस स्टेशन

बाबासाहेबांचा अपमान कदापी सहन करणार नाही. माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली असून भाजप असे प्रकार खपवून घेणार नाही.भाजपने नेहमीच बाबासाहेबांचा आदर केला आहे आणि आम्ही त्यांच्या विचारांवर चालतो.
सीता रहांगडाले,जिल्हाध्यक्ष, भाजप गोंदिया

error: Content is protected !!