Tuesday, June 23, 2026
सड़क अर्जुनी

डुग्गीपार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरविलेले 8 मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

सडक अर्जुनी, दि. 22 जून : डुग्गीपार पोलीस स्टेशनने हरविलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत यश मिळवत एकूण 8 अँड्रॉईड मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करून नागरिकांचा विश्वास जिंकला आहे.

पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील विविध नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. सायबर सेल, गोंदिया यांच्या सहकार्याने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर शोधून काढण्यात आलेले 8 मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून परत करण्यात आले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे आवाहन करत जनजागृतीही केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत ठाणेदार गणेश वनारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख, पोलीस उपनिरीक्षक नितीन देऊरकर, पोलीस हवालदार जगदीश मेश्राम, आशिष अग्निहोत्री, पोलीस नाईक महेंद्र सोनवाने तसेच पोलीस शिपाई उद्देभान रुखमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

डुग्गीपार पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

error: Content is protected !!