मद्यपान, अतिवेग आणि विनाहेल्मेट वाहनचालकांवर कारवाई; ‘ऑपरेशन यू-टर्न’ सुरू
सडक अर्जुनी, दि. 22 : जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ ही विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. 
महामार्ग प्रादेशिक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगावचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राम ब्राम्हणीसह जिल्ह्यातील विविध गर्दीच्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेबाबत माहिती दिली.
यावेळी महामार्गावर वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच सुरक्षित वाहन चालविण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहनही पोलिसांनी केले.

‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेअंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, विनाहेल्मेट वाहन चालविणे तसेच महामार्गावर निष्काळजीपणे वाहने उभी करणे अशा प्रकारांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक शिस्त आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अपघातमुक्त महामार्गाच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.
