Friday, October 2, 2026
क्राइमगोंदिया

गोंदियात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; लॉज चालकाला अटक, तर ४ महिलांची सुटका

गोंदिया : शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) रेल्वे स्टेशन परिसरातील राधिका लॉजवर अचानक छापा टाकून सुरू असलेल्या देहविक्री (वेश्या व्यवसाय) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी लॉज मालकाला अटक केली असून, चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे गोंदिया शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने राधिका लॉजवर पंचांसमक्ष छापा मारला. या वेळी लॉज चालक व मालक जगदीश भामनानी (वय ५४ वर्षे, रा. हेमू कॉलनी चौक, यादव चौक, गोंदिया) हा चार महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे रंगेहात आढळून आले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून, चारही पीडित महिलांची या पाशातून सुटका केली.

या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद अप.क्र. ८०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम १४३(२)(३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा निकम, सहाय्यक फौजदार जितेंद्र मिश्रा, पोलीस हवालदार बलराज लांजेवार, रूपेश सुखदेवे, महिला पोलीस हवालदार शिल्पा बडवाईक, पोलीस शिपाई रवींद्रकुमार मेश्राम, महिला पोलीस शिपाई मंजू बागडे आणि चालक महिला पोलीस शिपाई सुरेखा मेंढे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

error: Content is protected !!