Friday, October 2, 2026
गोंदिया

रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा – जिल्हाधिकारी मंदार पत्की

गोंदिया, दि.1 : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातांची कारणे शोधून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 कार्यकारी अभियंता बलवंत रामटेके, सा.बां. विभाग क्र.2 कार्यकारी अभियंता एस.डी. उसेंडी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास चौधरी, वाहतुक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर, जि.प. सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता जितेंद्र सोरले, विद्युत विभागाचे उपअभियंता हेमंत सिरीया, एसटी महामंडळाचे व्यवस्थापक येतीश कटरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्ह्यातील ब्लॅकस्पॉट व अपघातप्रवण स्थळांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ते सुधारणा, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टीव टेप, पथदिवे आदी सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.

यावेळी जिल्ह्यातील रस्ते अपघात, ब्लॅकस्पॉट, अपघातप्रवण स्थळे, रस्ते सुधारणा, वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याबाबत आढावा घेण्यात आला.

अपघातप्रवण ठिकाणी रस्त्यांची स्थिती, वळणे, चौक, दृश्यमानता, प्रकाश व्यवस्था व दिशादर्शक फलकांची पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी रुग्णालये, ट्रॉमा केअर सेंटर व रुग्णवाहिका सेवांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रस्ता सुरक्षा नियमांबाबत नागरिक, विद्यार्थी व वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा. रस्ता सुरक्षा कक्ष व रस्ता सुरक्षा रथाच्या माध्यमातून जनजागृती अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

रस्ते अपघातांमधील जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी स्पष्ट केले.

बैठकीत रस्ते अपघातांचा आढावा, ब्लॅकस्पॉट व अपघातप्रवण स्थळांवरील उपाययोजना, रस्ते सुधारणा व देखभाल, वैद्यकीय सेवा, रस्ता सुरक्षा अंमलबजावणी, जनजागृती, रस्ता सुरक्षा कक्ष, रस्ता सुरक्षा रथ, रिफ्लेक्टीव टेप तसेच रस्ता सुरक्षा प्रचार-प्रसार या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यात 15 ब्लॅकस्पॉट असून, अपघातप्रवण स्थळे (Vulnerable Spots) 41 आहेत. त्यामुळे नगरपरिषदेतर्फे सिग्नलवर झेब्रा क्रॉस लाऊन देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

error: Content is protected !!